केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:03 IST2017-12-10T23:59:31+5:302017-12-11T00:03:51+5:30

केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक
कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
कºहाड येथे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा राजकीय, सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृतमहोत्सव असा संयुक्त कार्यक्रम पार पडला; त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते. माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विनोद शिरसाठ, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘देश कुठे चाललाय, हे कळत नाही. देशात हुकूमशाही वाढू लागल्याचे चित्र दिसतंय. मी गृहमंत्री असतानाही अनेक गोष्टी केल्या; पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. खरंतर गृहमंत्री म्हणून काम करीत असताना अनेक गोष्टी या गोपनीय ठेवाव्या लागतात. आमच्या काळातही मिलीटरी स्ट्राईक झाले होते, पण यांनी त्याला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे गोंडस नाव देऊन आम्ही काही तरी वेगळं केलं आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेसचा एकदा नव्हे दोनदा नव्हे, तर तब्बल तीनवेळा पराभव झाला आणि आता काँग्रेस संपली अशा वल्गना सुरू झाल्या. मात्र, काँग्रेस कधी संपली नाही आणि संपणार नाही. काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. देशातील आणि राज्यातील सद्य:स्थिती पाहता जनतेमध्ये प्रचंड राग पसरला असून, काँगे्रस पुन्हा एकदा उंच भरारी घेईल.’
ईव्हीएम घोटाळ्यावर टीका
आम्ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर प्रेम करणारी माणसे आहोत. पराभूत झालो म्हणून हटणारे नाही. ज्या इंदिरा गांधींचा लोकांनी पराभव केला त्यांनाच लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. अन् तेही बटण दाबून नव्हे, असं म्हणत शिंदे यांनी ईव्हीएम मशीन घोटाळ्यावर अप्रत्यक्ष टीका केली.